मुख्यमंत्री फडणवीसांची अजित पवारांवर कुरघोडी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवरुन महायुतीत नव्या तणावाची ठिणगी

Foto
पुणे : महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षात पुणे आणि ठाण्यात जुंपली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्‍वस्त असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या संस्थेला राज्य सरकारने दिलेल्या अनुदानाची चौकशी करण्याचा आदेश देऊन अजित पवार यांच्यावर कुरघोडी केली आहे. कडक शिस्तीचे अर्थमंत्री म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्याशी संबंधित संस्थेचीच चौकशी होणार असल्याने आता महायुतीतील भाजप विरूद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागताच महायुतीतील मित्रपक्षांनी आपापले खरे चेहरे दाखविण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झाले. त्यानंतर पुण्यात जैन बोर्डिंग प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप- प्रत्यारोप झाले. पुण्यात भाजप आणि शिवसेनेने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कुरघोडी केली आहे.

व्हीएसआय ही ऊस शेती आणि उत्पादनांवर संशोधन करणारी 1975 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. ऊस उत्पादकांच्या उसाच्या देयकातून प्रतिटन एक रुपया या संस्थेला राज्य शासनाच्या आदेशानुसार दिला जातो. तसेच 2009 पासून विविध स्वरूपाची अनुदाने या संस्थेला राज्य शासनाकडून देण्यात आली आहेत. या अनुदानाच्या रकमेचा विनियोग कसा करण्यात आला, याची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिला आहे. त्यासाठी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आहेत. विश्‍वस्त मंडळामध्ये उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेची चौकशी नसून, केवळ अनुदानाच्या रकमेची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार हे कडक शिस्तीचे अर्थमंत्री म्हणून ओळखले जातात. मात्र, अनुदानाच्या विनियोगाच्या माध्यमातून त्यांचा संबंध असलेल्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी होणार असल्याने आता भाजप आणि अजित पवारांच्या ङ्गराष्ट्रवादीफत पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या प्रकरणानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर हे प्रकरण थंडावले. आता पुन्हा महायुतीतीत या मित्रपक्षांमध्ये जुंंपणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एका निर्णयाने दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते लक्ष्य?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसचे नेते लक्ष्य होणार असल्याची चर्चा आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. विश्‍वस्त मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री जयंत पाटील हे आहेत. तसेच काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. नियामक मंडळावर या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी मंत्री हर्षंवर्धन पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि आमदार रोहित पवार हे आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री विश्‍वजीत कदम आणि सतेज पाटील यांचा समावेश आहे.